अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सादरीकरण; सर्वसामान्यांना दर्जेदार उपचार देण्याचे आयुक्तांचे निर्देश.
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडकरांची ‘लाईफलाईन’ समजल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज कंबर कसली. १ मे रोजीची शासकीय सुट्टी असतानाही त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांचा धावता दौरा करून अचानक पाहणी केली. केवळ पाहणीच नव्हे, तर आयुक्तांनी प्रत्येक विभागातील सोयी-सुविधांचे जणू ‘ऑडिट’च केले.
११ पेक्षा अधिक विभागांची बारकाईने पाहणी
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज सकाळी वायसीएम रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी अतिदक्षता विभाग (ICU), नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU), मेडिसिन, शस्त्रक्रिया, बालरोग, अस्थिरोग, कान-नाक-घसा (ENT), दंतचिकित्सा, अल्ट्रासोनोग्राफी (USG), क्ष-किरण (X-Ray), डायलिसिस आणि आपत्कालीन विभागाची पाहणी केली. वाढत्या तापमानाचा विचार करता, रुग्णालयातील ‘उष्माघात कक्षा’ची त्यांनी विशेषत्वाने पाहणी करून तेथील सज्जतेचा आढावा घेतला.
रुग्णांशी थेट संवाद आणि सूचना
आयुक्तांनी केवळ अधिकाऱ्यांकडून माहिती न घेता, थेट रुग्णांच्या खाटांपर्यंत जाऊन त्यांच्याशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. रुग्णालयात मिळणारे उपचार, डॉक्टरांची उपलब्धता आणि औषधांचा पुरवठा याबाबत त्यांनी विचारपूस केली. रुग्णांनी व्यक्त केलेल्या समाधानाबद्दल त्यांनी कौतुक केले, मात्र सेवा अधिक तत्पर आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
प्रशासकीय आढावा आणि नियोजन
यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांनी आयुक्तांना रुग्णालयातील उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ आणि भविष्यातील नियोजनाबाबत सविस्तर सादरीकरण (Presentation) केले. “शहरातील नागरिकांना परवडणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात वायसीएम रुग्णालय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यामध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे,” असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
या पाहणी दौऱ्यावेळी सह. प्राध्यापक डॉ. किशोर सूर्यवंशी, डॉ. मोहन वाघमारे, सिनियर सिस्टर शबनम सय्यद तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
—
“आज वायसीएम रुग्णालयाला भेट देऊन येथे उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. तसेच उपस्थित रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवादून साधून त्यांच्या अडी-अडचणी समजून घेतल्या. रुग्णालयातील उपलब्ध सुविधा, डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांमार्फत देण्यात येत असलेल्या सेवा समाधानकारण असल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले. नागरिकांना अधिक दर्जेदार, तत्पर आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.”
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
—
“आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रुग्णालयातील प्रत्येक विभागाची बारकाईने पाहणी केली. रुग्णांशी थेट संवाद साधत त्यांनी विविध विभागांची कार्यपद्धती, उपचार सेवा, उपलब्ध सुविधा आणि रुग्ण व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती घेतली. वायसीएम रुग्णालयामार्फत नागरिकांना अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी आमचे सर्व वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचारी सातत्याने कार्यरत आहेत.”
– डॉ. अभयचंद्र दादेवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
