२४ तासांत ९० मिमी पावसाची दमदार नोंद; तरीही गेल्या वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा अद्याप खूपच कमी
पिंपरी-चिंचवड : शहरासाठी जीवनदायी असलेल्या पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत दमदार पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात दिलासादायक वाढ झाली आहे. शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत तब्बल ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणातील पाणीसाठा १.१८ टक्क्यांनी वाढून १८.८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या दोन दिवसात धरण साठ्यात दोन टक्के वाढ झाली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात १ जूनपासून आतापर्यंत धरण परिसरात ३४४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या कालावधीत धरणातील पाणीसाठ्यात एकूण २ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाणलोट क्षेत्रातून धरणात पाण्याची आवक वाढू लागल्याचे चित्र आहे.
मात्र, सध्याचा पाणीसाठा दिलासादायक असला तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत परिस्थिती अद्याप चिंताजनक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी पवना धरणात ६९.११ टक्के पाणीसाठा होता, तर यंदा तो केवळ १८.८५ टक्के आहे. त्यामुळे तब्बल ५० टक्क्यांहून अधिकची तफावत कायम आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने मुसळधार पाऊस झाल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची मानली जात असून, नागरिकांच्या नजरा आता आगामी पावसाकडे लागल्या आहेत.
