Pimpri-Chinchwad-पवना धरण तुडुंब, तरीही पाणीकपात कायम; पिंपरी-चिंचवडकरांचा संताप वाढला! धरणात ८५.७५ टक्के पाणीसाठा, तरी १५ टक्के कपात मागे नाही; पूर्ववत पाणीपुरवठ्याची नागरिकांची जोरदार मागणी

पिंपरी-चिंचवड :
पवना धरणात दिवसागणिक पाणीसाठा झपाट्याने वाढत असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेने लागू केलेली १५ टक्के पाणीकपात अद्याप कायम असल्याने शहरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येत नसल्याने नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

बुधवारी सकाळच्या आकडेवारीनुसार पवना धरणात ८५.७५ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या २४ तासांत धरण परिसरात ५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, एका दिवसात पाणीसाठ्यात २.८३ टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदा १ जूनपासून आतापर्यंत १,७२३ मिलिमीटर पाऊस झाला असून, धरणातील साठ्यात ६८.९५ टक्क्यांची एकूण वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच दिवशी धरणात ७७.८० टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा पाणीसाठा लक्षणीय अधिक आहे. तरीही शहरातील नागरिकांना अद्याप कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक भागांत पाणीपुरवठ्याच्या वेळांमध्ये कपात कायम असल्याने नागरिकांना दैनंदिन नियोजनात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने केलेली कपात त्या वेळी योग्य होती. मात्र, आता धरणात भरपूर पाणी उपलब्ध असताना तीच कपात कायम ठेवण्याचे कोणतेही कारण उरलेले नाही. त्यामुळे १५ टक्के पाणीकपात तातडीने मागे घेऊन पूर्वीप्रमाणे नियमित वेळेत आणि पूर्ण दाबाने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी विविध गृहनिर्माण संस्था, नागरिक संघटना आणि रहिवाशांकडून जोर धरू लागली आहे.

दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस पुणे जिल्हा आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय तातडीने पुनर्विचार करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शहरभरातून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *