पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून विदेशी दारू, बिअर आणि गावठी हातभट्टीची बेकायदेशीर वाहतूक व विक्री करणाऱ्या एकूण पाच आरोपींवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रिक्षांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आहे. ही कारवाई ११ व १२ जून २०२६ रोजी केली आहे.
लोकेश बालराज जलनिला (वय २८, रा. दापोडी, पुणे) या रिक्षा चालकासह हरपाल महेंद्र पाल (वय २४, रा. दापोडी, पुणे), संगिता योगेश राठोड (वय ३५, रा. हवालदार वस्ती, मोशी), वासुदेव धोडीराम सूर्यवंशी (वय ५६, रा. नवी सांगवी), क्रिपासिन्धुं शामसिंग (वय २८, रा. पिंपळे गुरव) आणि उपेंद्र विक्रमा गुप्ता (वय ३०, रा. मोशी) यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात इराणी कॅफेसमोर आरोपी लोकेश व हरपाल हे बजाज ऑटो रिक्षा (क्र. MH 14 LS 7460) मधून एक लाख ५२ हजार ४४० रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या बिअरच्या बाटल्यांची विनापरवाना वाहतूक करताना रंगेहात सापडले. दुसऱ्या कारवाईत, दिघी हद्दीतील डुडुळगाव येथील मोकळ्या जागेत आरोपी संगिता राठोड ही दोन हजार रुपये किमतीची २० लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना मिळून आली.
तसेच सांगवी पोलिसांनी नवी सांगवीतील हॉटेल समरनाईनसमोर ऑटो रिक्षा (क्र. MH 14 HM 0909) मधून २६ हजार ५० रुपये किमतीच्या विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वासुदेव सूर्यवंशी व क्रिपासिन्धुं शामसिंग या दोघांना ताब्यात घेतले. चौथ्या कारवाईत, भोसरी एमआयडीसी पोलिसांनी मोशी खडी मशीन रोडवर हॉटेल अजिंक्यताारा समोरील टपरीजवळ सहा हजार ७३० रुपयांची विदेशी दारू जप्त करून आरोपी उपेंद्र गुप्ता याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. या सर्व प्रकरणांचा पुढील तपास अनुक्रमे पिंपरी, दिघी, सांगवी आणि एम.आय.डी.सी भोसरी पोलीस ठाणे करीत आहेत.
इराणी कॅफे व हॉटेल समरनाईन परिसरात दारूची अवैध वाहतूक पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई
