Pimpri-Chinchwad-१५ ऑगस्टपासून ‘नो सेग्रिगेशन, नो कलेक्शन’ कचरा विलगीकरणाशिवाय घंटागाडी कचरा उचलणार नाही ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा वेगळा करणे बंधनकारक नियमभंग करणाऱ्यांवर महापालिकेचा कठोर बडगा

पिंपरी-चिंचवड :
स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्टपासून कचऱ्याचे विलगीकरण न करणाऱ्या नागरिकांचा आणि व्यावसायिक आस्थापनांचा कचरा महापालिकेच्या घंटागाड्यांमार्फत उचलला जाणार नाही. त्यामुळे प्रत्येक घर, गृहनिर्माण संस्था, हॉटेल, रुग्णालय आणि व्यावसायिक आस्थापनांना आता कचरा चार प्रकारांत वर्गीकृत करूनच द्यावा लागणार आहे.

महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरात ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा स्वतंत्रपणे वर्गीकृत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईही केली जाणार आहे.

शहरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून विकेंद्रित कचरा व्यवस्थापनाला प्राधान्य दिले जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत स्थानिक पातळीवर कचरा प्रक्रिया केंद्रे उभारली जाणार आहेत. त्यामुळे कचऱ्याची वाहतूक कमी होईल. स्थानिक स्तरावरच शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे शक्य होणार आहे.

मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांसाठीही नवे नियम लागू करण्यात आले आहेत. १५ ऑगस्टनंतर अशा आस्थापनांचा कचरा घंटागाडी उचलणार नाही. संबंधितांनी स्वतःच्या परिसरात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे अनिवार्य राहणार आहे.

महापौर रवि लांडगे यांनी नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “कचरा विलगीकरण हा केवळ नियम नाही, तर शहराच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सर्वांनी कचरा वर्गीकृत करून महापालिकेला सहकार्य करावे,” असे त्यांनी म्हटले.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही नियमांची कठोर अंमलबजावणी होणार असल्याचे स्पष्ट केले. “प्रत्येक नागरिकाने कचरा विलगीकरणाची सवय लावली, तर लँडफिलवर जाणारा कचरा मोठ्या प्रमाणात कमी होईल. पुनर्वापराला चालना मिळेल आणि शहर अधिक स्वच्छ होईल,” असे त्यांनी सांगितले.

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी विकेंद्रित कचरा व्यवस्थापनामुळे प्रक्रिया अधिक प्रभावी होईल, असे सांगितले. उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी १५ ऑगस्टपूर्वीच प्रत्येक नागरिकाने कचरा वर्गीकरण सुरू करण्याचे आवाहन केले.

महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापनात मोठा बदल होण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, स्वच्छ आणि शाश्वत पिंपरी-चिंचवडच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *