पिंपरी-चिंचवड ः
लोकसेवेच्या नावाखाली अमली पदार्थांची काळी तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आयटी हब हिंजवडीत ड्रग्ज विकायला आलेला मुख्य सूत्रधार चक्क सत्ताधारी पक्षाचा लोकप्रतिनिधी निघाल्याने राजकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे. तरुण पिढीला उद्ध्वस्त करणाऱ्या या राजकीय ‘ड्रग्ज माफिया’मुळे आता लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयटी हबमध्ये लाखो रुपयांचे ‘एमडी’ (मेफेड्रोन) ड्रग्ज विकणारी टोळी पकडली गेली आहे. या आंतरजिल्हा ड्रग्ज रॅकेटचे थेट ‘खंडाळा कनेक्शन’ उघड झाले आहे. या काळ्या धंद्याचा मुख्य सूत्रधार दुसरा कोणी नसून एक लोकप्रतिनिधी आहे. खंडाळा तालुक्यातील अहिरे गावचा माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दयानंद धायगुडे हाच या रॅकेटचा मास्टरमाईंड निघाला आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाशी संबंधित आहे. लोकप्रतिनिधीच ड्रग्ज तस्कर निघाल्याने परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
संयुक्त कारवाईत आणखी ड्रग्ज जप्त
पिंपरी-चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाने खंडाळा पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. पोलिसांनी आरोपींच्या खंडाळ्यातील खोलीवर छापा टाकला. तेथून आणखी २ लाख ८४ हजार ४०० रुपये किमतीचे २८.४४ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहेत.
आयटी हबमध्ये रचला सापळा
पोलिसांना हिंजवडी परिसरात ड्रग्ज विक्रीची माहिती मिळाली होती. पोलिसांनी गुरुवारी (दि. ११) तिथे सापळा रचला. पोलिसांनी तिघांना रंगेहात ताब्यात घेतले. अक्षय प्रदीप धायगुडे (वय ३१), दयानंद उत्तम धायगुडे (वय ३८, माजी उपसरपंच), महेश पुनाराम किचड उर्फ बिश्नोई (वय २१, सर्व रा. अहिरे, ता. खंडाळा) या तिघांची अंगझडती घेण्यात आली. त्यांच्याकडून ११ लाख ५५ हजार ५०० रुपयांचे ६१.७० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. तसेच एक चारचाकी गाडी आणि तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
पांढरपेशा बुरख्याआड काळा धंदा
दयानंद धायगुडे हा गावात स्वतःला समाजसेवक म्हणवून घ्यायचा. राजकारणाच्या आडोश्याने तो ड्रग्जचे मोठे नेटवर्क चालवत होता. पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत अशपाक उर्फ मोन्या काझी (रा. अहिरे) आणि हनुमान किलेरी उर्फ बिश्नोई (रा. खंडाळा) या दोघांची नावे समोर आली आहेत. पोलीस आता या दोघांचा शोध घेत आहेत.
काळ्या पैशाचा राजकारणात वापर?
”लोकप्रतिनिधीच जर तरुण पिढीला बरबाद करणार असतील, तर दाद कोणाकडे मागायची?” असा संतप्त सवाल खंडाळा तालुक्यातील नागरिक विचारत आहेत. या ड्रग्जच्या काळ्या पैशाचा वापर राजकारणात आणि निवडणुकांमध्ये केला जात होता का? या दृष्टीने आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणाच्या मूळाशी जाण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला आहे.
