Pimpri-Chinchwad लग्नसराईने फुलांना ‘सोन्याचा भाव’; पिंपरीच्या बाजारात झेंडू-शेवंतीची दरवाढ

उन्हाच्या तडाख्याने उत्पादन घटले; आवक कमी, मागणी वाढली; ग्राहक आणि मंडप व्यावसायिकांचे बजेट कोलमडले

पिंपरी-चिंचवड :
अधिक महिना संपून लग्नसराईचा हंगाम आता सुरू होणार आहे. तसेच धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आणि त्यातच उन्हाच्या तीव्र झळा यामुळे पिंपरी-चिंचवडच्या फुल बाजारात सध्या दरवाढीचा ‘सुगंध’ दरवळत आहे. फुलांची आवक लक्षणीयरीत्या घटली आहे. मात्र मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी झेंडू, शेवंती, गुलछडी आणि इतर फुलांचे दर चांगलेच वधारले असून ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे.

पिंपरीतील फुल बाजारात सध्या सकाळच्या काही तासांतच बहुतांश माल विकला जात आहे. पूर्वी सकाळी उशिरापर्यंत गजबजलेला असणारा बाजार आता आठ वाजण्यापूर्वीच रिकामा होत असल्याचे चित्र आहे. फुलांची आवक कमी असल्याने व्यापाऱ्यांनाही ग्राहकांना रिकाम्या हाताने परत पाठवावे लागत आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेने अनेक फुलबागांना फटका बसला आहे. पाण्याची टंचाई आणि वाढलेले तापमान यामुळे फुलांचे उत्पादन घटले. अनेक ठिकाणी फुलांचा दर्जाही खालावला. त्यामुळे बाजारात येणाऱ्या मालाचे प्रमाण कमी झाले आहे. दुसरीकडे लग्नसमारंभ, साखरपुडे, गृहप्रवेश, धार्मिक कार्यक्रम आणि विविध उत्सवांमुळे फुलांची मागणी कायम आहे. याचाच परिणाम दरवाढीत दिसून येत आहे.

विशेषतः सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या पिवळ्या आणि केशरी झेंडूला मोठी मागणी आहे. काही दिवसांपूर्वी २०० ते ३०० रुपयांत मिळणारा झेंडू आता थेट ७०० ते ८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. शेवंती, गुलछडी आणि इतर फुलांच्याही दरात लक्षणीय वाढ झाली आहे.

सध्याचे प्रमुख बाजारभाव
पिवळा झेंडू : ७०० ते ८०० रुपये प्रति कॅरेट
केशरी झेंडू : ७०० ते ८०० रुपये प्रति कॅरेट
शेवंती : १८० ते २०० रुपये प्रति किलो
गुलछडी : १४० ते १६० रुपये प्रति किलो
पर्पल (गेलडा) : १४० ते १६० रुपये प्रति किलो
गुलाब जुही : ५० ते ८० रुपये प्रति जुडी
बिजली : ११० रुपये प्रति गाठोडे
लिली : १५ ते २० रुपये प्रति बंडल
व्यापाऱ्यांच्या मते, पुढील काही दिवसांतही दर कमी होण्याची शक्यता कमी आहे. पावसाळ्यापूर्वीचा उष्णतेचा कालावधी आणि सुरू असलेली लग्नसराई यामुळे बाजारातील तेजी कायम राहू शकते.

फुलांच्या वाढत्या दरांचा फटका केवळ ग्राहकांनाच नाही, तर मंडप सजावट व्यावसायिक, कार्यक्रम आयोजक आणि धार्मिक संस्थांनाही बसत आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात फुलांच्या सुगंधासोबत दरवाढीची झळही सर्वांनाच सहन करावी लागत असल्याचे चित्र पिंपरी-चिंचवडमध्ये दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *