पुणे, दि. १४ (प्रतिनिधी) –
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या-येणाऱ्या भाविक आणि वारकऱ्यांच्या वाहनांना राज्य शासनाकडून पथकरातून (टोल) संपूर्ण सूट देण्यात आली आहे. या पथकर सवलतीचे स्टिकर आणि पास सुलभतेने मिळावेत, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), पुणे येथे ‘खटला विभागात’ एक स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. ६ जुलै ते २९ जुलै २०२६ या कालावधीत ही टोलमाफी लागू असणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी वाहनधारकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आषाढी वारीसाठी जाणाऱ्या हलक्या आणि जड वाहनांना टोलमाफीचा लाभ दिला जाणार आहे. हा पथकर सवलतीचा स्टिकर किंवा पास मिळविण्यासाठी वाहनधारकांनी २९ जुलै २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करणे गरजेचे आहे.
अर्ज करताना खालील कागदपत्रे सोबत जोडणे बंधनकारक आहे:
वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (RC Book)
वैध वाहन विमा (Insurance)
पीयूसी (PUC)
वाहन कर (Vehicle Tax)
ड्रायव्हिंग परवाना (Driving License)
योग्यता प्रमाणपत्र (Fitness Certificate)
वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी वाहनधारकांनी वेळेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून या विशेष कक्षातून आपले पास प्राप्त करून घ्यावेत, असे आवाहन आरटीओ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Pune-वारकऱ्यांसाठी मोठी बातमी! आषाढी वारीला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफ; पुणे RTO मध्ये विशेष कक्षाची स्थापना
