कोल्हापूर
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी विविध भागांत सुरू असलेल्या जमीन मोजणीच्या कामावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता पोलिसांच्या बंदोबस्तात जमीन मोजणी सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाची तुलना थेट “खाकी वर्दीतील दरोडेखोर” आणि “जनरल डायरच्या औलादी”शी केली.
शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. जमीन संपादनामुळे सुपीक शेती आणि उपजीविकेची साधने धोक्यात येणार असल्याचे सांगत शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. अशा परिस्थितीत महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पोलिसांच्या संरक्षणात जमीन मोजणीचे काम सुरू असल्याचे समोर आले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. “शेतकऱ्यांची संमती नसताना आणि त्यांचे म्हणणे ऐकून न घेता पोलिसांच्या जोरावर जमीन मोजणी केली जात आहे. लोकशाहीत जनतेचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे,” असे ते म्हणाले.
शेट्टी यांनी पुढे सांगितले की, विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. महामार्गासाठी निवडण्यात आलेला मार्ग बदलण्याच्या मागणीकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही प्रशासनाकडून पोलिसी बळाचा वापर होत असल्याने ग्रामीण भागात संतापाचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, शक्तीपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात असून महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांना जोडण्याचा त्यामागील उद्देश असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र या प्रकल्पासाठी होणाऱ्या जमीन संपादनावरून अनेक ठिकाणी विरोधाची धार तीव्र होताना दिसत आहे.
राजू शेट्टी यांच्या आक्रमक वक्तव्यानंतर शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आगामी काळात शेतकरी संघटनांचे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
