मुंबई(mumbai) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी नीलम गोऱ्हे यांचे नाव चर्चेत असतानाच, ऐनवेळी सचिन अहिर यांची उमेदवारी पुढे आल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या निर्णयामागे नेमके कोणते राजकीय गणित आहे, याची चर्चा महायुतीच्या वर्तुळात सुरू झाली आहे.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपमधील काही नेत्यांची नाराजी, महायुतीतील अंतर्गत समतोल तसेच आगामी राजकीय समीकरणे लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या क्षणी नवा डाव टाकत सचिन अहिर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे.
सचिन अहिर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ सोडल्यानंतर त्यांना विधान परिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी देण्यात आल्याने या निर्णयाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसरीकडे, नीलम गोऱ्हे यांचे नाव अंतिम क्षणापर्यंत चर्चेत असूनही त्यांना संधी न मिळाल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
मात्र, नीलम गोऱ्हेंना भाजपच्या नाराजीचा फटका बसला किंवा त्यामागे हेच कारण आहे, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. महायुतीतील कोणत्याही पक्षाने यासंदर्भात अधिकृत भूमिका मांडलेली नसून, सध्या या घडामोडींविषयी राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत.
दरम्यान, उपसभापतीपदाच्या निवडीमुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणे आणि आगामी राजकीय रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
