महापौर चषकावर रत्नागिरीच्या ‘वाघजाई’ आणि पुण्याच्या ‘राजमाता जिजाऊ’ संघाचे नाव साहिल पाटील ठरला ‘मॅन ऑफ द सीरिज’!

पिंपरी-चिंचवड ः
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६’ चा थरार नुकताच पार पडला. या अटीतटीच्या लढतीत पुरुष गटात रत्नागिरीच्या वाघजाई कबड्डी संघाने, तर महिला गटात पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

​नवोदित खेळाडूंना मोठे व्यासपीठ – महापौर रवि लांडगे
“महापौर चषक ही केवळ एक स्पर्धा नसून राज्यातील नवोदित खेळाडूंना स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची एक मोठी संधी आहे. पिंपरी-चिंचवड शहर हे क्रीडा संस्कृतीला चालना देणारे शहर म्हणून ओळखले जात आहे. अशा स्पर्धांमधून भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील,” असा विश्वास महापौर रवि लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला.

मान्‍यवरांची उपस्थिती
या समारंभास आमदार महेश लांडगे, विधानपरिषद सदस्य माजी मंत्री सचिन अहिर, क्रीडा सभापती कैलास कुटे, नगरसदस्या भीमाताई फुगे, शीतल शिंदे, सागर गवळी, दत्ता गव्हाणे, सचिन तापकीर, माजी नगरसदस्य विलास मेडिगिरी, पंडितराव गवळी, सहाय्यक कामगार आयुक्त अश्विनी साकोरे आणि उपायुक्त पंकज पाटील यांच्यासह क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाघजाई आणि राजमाता जिजाऊ संघाची बाजी
या स्पर्धेत पुरुष गटात रत्नागिरीच्या वाघजाई कबड्डी संघाने प्रथम क्रमांक पटकावत शानदार कामगिरी केली. कोल्हापूरचा शिवमुद्रा संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला, तर बारामती स्पोर्ट क्लबने तृतीय आणि पुण्याच्या सतेज संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. महिला गटात पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले. मुंबईचा शिवशक्ती संघ द्वितीय, बारामती स्पोर्ट क्लब तृतीय आणि नंदुरबारचा धर्मवीर कबड्डी संघ चतुर्थ क्रमांकावर राहिला.

​वैयक्तिक पारितोषिकांचा वर्षाव
स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांमध्ये पुरुष गटात साहिल पाटील यांना “सर्वोत्कृष्ट खेळाडू” म्हणून बुलेट गाडी प्रदान करण्यात आली, तर अर्जुन तडस यांना ७५ हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले. “सर्वोत्कृष्ट चढाई” पुरस्कार अजिंक्य पवार यांना चेतक गाडी देऊन सन्मानित करण्यात आले, तर अजित चव्हाण यांना ५० हजार रुपये देण्यात आले. “सर्वोत्कृष्ट पकड” प्रकारात शुभम शिंदे यांना चेतक गाडी, तर वैभव रबाडे यांना ५० हजार रुपये व चषक प्रदान करण्यात आला.

​महिला गटात निकिता पडवळ यांना “सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू” म्हणून चेतक गाडी देण्यात आली, तर मृणाली भुवड यांना ७५ हजार रुपये व चषक प्रदान करण्यात आला. “सर्वोत्कृष्ट चढाई” प्रकारात सोनाली शिंगटे यांना चेतक गाडी, तर मनिषा बारटक्के यांना ५० हजार रुपये व चषक देण्यात आला. तसेच “सर्वोत्कृष्ट पकड” पुरस्कार ऋतुजा तिगडे यांना चेतक गाडी आणि हर्षदा सोनवणे यांना ५० हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
​यावेळी क्रीडा क्षेत्रातील दिग्गज शकुंतला खटावकर, सूर्यकांत पाटील, संगीता सोनावणे, सायली क्रिपाळे, अमरदीप चांदुगुडे, सुनील लांडे आणि रामदास लांडगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या स्पर्धेने राज्यभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *