Mumbai-मुंबईतील रस्ते, मेट्रो कामांवरून संजय राऊत यांची सरकारवर टीका; ‘मुंबईकरांनी प्रवास कसा करावा?’

मुंबई : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांची अवस्था, सुरू असलेली विकासकामे आणि वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “मुंबईतील अनेक रस्ते पत्रे लावून खोदून ठेवले आहेत. मेट्रोची अनेक कामे अद्याप अर्धवट अवस्थेत आहेत. अर्धी मुंबई खणून ठेवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पावसाळ्यात नवीन कामे काढली जात असल्याने मुंबईकरांनी प्रवास कसा करावा?”

मुंबईच्या विकासकामांबाबत प्रश्न उपस्थित करताना त्यांनी मुंबईचे पालकमंत्री आणि प्रशासनावरही निशाणा साधला. शहरातील वाहतूक, पाणी तुंबणे आणि रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच, “राज्याच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या राजधानीत राहणाऱ्या जनतेची काही चिंता आहे की नाही?” असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागांत वाहतुकीवर परिणाम झाला असून विविध विकासकामांमुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. राऊत यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *