नवी दिल्ली : नीट परीक्षा प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनाला विरोधी पक्षांच्या नेत्यांचा पाठिंबा वाढत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.
जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान शरद पवार यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्यांची माहिती घेतली. आंदोलनात सहभागी विद्यार्थी, युवक आणि संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
यापूर्वी विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर आता शरद पवार यांच्या भेटीमुळे या आंदोलनाला आणखी राजकीय बळ मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नीट परीक्षा प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJP च्या नेतृत्वाखाली जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू असून, आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.
