मुंबई(mumbai)-मुंबईच्या गोवंडी परिसरातील एका बालरुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई करत परवान्याविना सुरू असलेली अॅलोपॅथिक औषधविक्री उघडकीस आणली आहे. या कारवाईत तब्बल ९.०९ लाख रुपयांचा औषधसाठा आणि औषधविक्रीसाठी वापरले जाणारे बिल बुक जप्त करण्यात आले असून, या घटनेमुळे पालक आणि आरोग्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यभर सुरू असलेल्या विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत एफडीएच्या अधिकाऱ्यांनी १८ जून रोजी गोवंडी पूर्व येथील मुस्कान एनआयसीयू अॅण्ड चिल्ड्रन हॉस्पिटल येथे छापा टाकला. तपासणीदरम्यान रुग्णालयाचे संचालक डॉ. निलेश शाह यांनी दोन स्वतंत्र खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अॅलोपॅथिक औषधांचा साठा करून ठेवल्याचे आढळून आले.
धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित रुग्णालयाकडे वैध औषध विक्री परवाना नसतानाही औषधांची विक्री सुरू होती. एवढेच नव्हे तर रुग्णालयातील बारावी उत्तीर्ण रिसेप्शनिस्टमार्फत रुग्णांना औषधे विकली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. औषधविक्रीसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षित फार्मासिस्ट किंवा अधिकृत कर्मचारी नियुक्त नसल्याचेही निदर्शनास आले.
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कारवाईदरम्यान जप्त केलेल्या बिल बुकची तपासणी केली असता अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. बिलांमध्ये केवळ रुग्णाचे नाव, औषधाचे नाव आणि रक्कम नमूद करण्यात आली होती. मात्र औषधांचा बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक, मुदत समाप्ती दिनांक तसेच उत्पादक कंपनीची माहिती नमूद करण्यात आली नव्हती. त्यामुळे औषधांच्या वैधतेबाबत आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाने जप्त केलेला संपूर्ण औषधसाठा ताब्यात घेतला असून पुढील चौकशी सुरू केली आहे. औषध विक्री आणि वितरणासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशाराही एफडीएने दिला असून राज्यभर अशा प्रकारच्या बेकायदेशीर औषधविक्री केंद्रांवर कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
