पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – दुकानात शिरून चार लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून धमकावले. ही घटना सोमवारी (दि. २० एप्रिल) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पिंपळे सौदागर परिसरातील कुणाल आयकॉन रोडवरील ‘द मोमोवाला’ दुकानात घडली.
करण सतन कापरी (वय २०, रा. पिंपळे सौदागर; मूळ- रोहिणी, देवघर, झारखंड) यांनी मंगळवारी (दि. २१ एप्रिल) रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोपान गजानन बुलाखे (वय २१, रा. केशव नगर, पिंपळे सौदागर), ओंकार उद्धव बाबर (वय २०, रा. काटे वस्ती, पिंपळे सौदागर) आणि विवेक विनोद अंबोरे (वय १८, रा. पिंपळे सौदागर गावठाण; मूळ- केळवद वाडी, चिखली, बुलढाणा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास आरोपींनी दुचाकीवरून येत फिर्यादी करण कापरी यांच्या दुकानात प्रवेश केला. आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांच्याकडे चार लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. एकाने कोयता उगारून तर दुसऱ्याने स्टूलने दुकानातील साहित्याची, लॅपटॉपची आणि ग्राहकांच्या कारच्या काचेची तोडफोड केली. तसेच फिर्यादी आणि साक्षीदार यांना धमकी दिली. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
चार लाखांच्या खंडणीसाठी दुकानाची तोडफोड
