Mumbai-मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांच्या सहकार्यामुळे आपत्ती व्यवस्थापन प्रभावी – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जनजीवन आणि एकूण परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मंत्री लोढा म्हणाले की, मुंबईकरांनी संकटाच्या काळात प्रशासनाला दिलेले सहकार्य अत्यंत मोलाचे ठरले आहे. विविध यंत्रणांमध्ये समन्वय राखून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, पावसामुळे निर्माण होणाऱ्या प्रत्येक परिस्थितीवर प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून आहे.

त्यांनी नागरिकांना हवामान विभाग आणि महानगरपालिकेकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे तसेच आपत्कालीन परिस्थितीत अधिकृत नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, सभागृह नेते गणेश खणकर, अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अविनाश ढाकणे तसेच महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पावसाची सद्यस्थिती, आपत्कालीन प्रतिसाद, जलनिस्सारण व्यवस्था, वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *