नवी दिल्ली(delhi) : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बोलावलेल्या महत्त्वपूर्ण संसदीय पक्ष बैठकीला सहा खासदार गैरहजर राहिल्याने पक्षातील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. पक्षाने व्हिप जारी करूनही संबंधित खासदार बैठकीला उपस्थित न राहिल्याने पक्षातील संभाव्य फुटीच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
पक्षाचे लोकसभा गटनेते अरविंद सावंत यांनी बैठकीनंतर अनुपस्थित खासदारांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती दिली. या नोटिशींना सात दिवसांच्या आत समाधानकारक उत्तर न दिल्यास संबंधित खासदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पक्षाचे नेते अनिल देसाई यांनीही अनुपस्थित सदस्यांना नोटिसा पाठविण्यात आल्याची पुष्टी केली. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुढील कायदेशीर आणि संघटनात्मक कारवाईचा विचार केला जात असल्याचे पक्ष नेतृत्वाने स्पष्ट केले.
