हिंजवडीत सहा लाखांच्या अफिमसह तस्कराला अटक
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने हिंजवडी भागात कारवाई करत सहा लाख ६८ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह तस्कराला अटक केली आहे. ही कारवाई १६ जुलै रोजी सायंकाळी ५:१६ वाजण्याच्या सुमारास माण-हिंजवडी रस्त्यावरील नगरी ढाब्याशेजारी करण्यात आली.
पप्पुराम भारमल चौधरी (वय ४३, रा. राक्षे वस्ती, मानगाव, हिंजवडी) याला अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई गोविंद देवराव डोके यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पप्पुराम हा एक लाख ६३ हजार ६८० रुपयांचा सहा किलो ९९४ ग्रॅम वजनाचा अफिम आणि डुडा चुरा विक्रीसाठी घेऊन दुचाकीवरून चालला होता. पोलिसांनी त्याला दुचाकी व मोबाइलसह रंगेहात पकडले. हा माल त्याने राजस्थानमधील नागौर येथून आणल्याचे कबूल केले. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.