जुगारावर गुन्हे शाखेचा छापा; मुद्देमालासह तिघे ताब्यात
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळवणाऱ्या अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. ही कारवाई १७ जुलै रोजी सायंकाळी ४:४५ वाजण्याच्या सुमारास चिंचवडमधील नागसेन नगर झोपडपट्टीत करण्यात आली.
जुगार अड्डा मालक शंकर सदाशिव मिसाळ (वय ३९, रा. बिजली नगर, चिंचवड), रायटर सचिन ज्ञानोबा काळे (वय २५), महेश रमेश शहा (वय ४८) यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस हवालदार शिवराम बाळासाहेब भोपे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे स्वीकारून ‘मुंबई व कल्याण’ नावाचा मटका जुगार खेळवत असताना गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत ३२ हजार ३१० रुपये किमतीच्या मुद्देमालासह आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.
पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.