Mumbai-कैद्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारचा विशेष उपक्रम; टाटा सामाजिक विज्ञान संस्थेशी सामंजस्य करार

मुंबई(mumbai) : गुन्हेगारीचा मार्ग सोडून कैद्यांनी पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, सन्मानाने जीवन जगावे आणि त्यांच्या कुटुंबांना स्थैर्य मिळावे यासाठी राज्य शासनाने विशेष पुनर्वसन उपक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राज्यातील विविध कारागृहांमध्ये राबविण्यात येत असून, त्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीआयएसएस) यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत कैद्यांना मानसिक, सामाजिक आणि भावनिक आधार देऊन त्यांचे सकारात्मक पुनर्वसन करण्यावर भर दिला जात आहे. गुन्हेगारी जगतापासून दूर जाऊन नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि समुपदेशन उपलब्ध करून दिले जात आहे.

सध्या हा उपक्रम मुंबई, ठाणे, तळोजा, येरवडा (पुणे), नागपूर आणि नाशिक येथील प्रमुख मध्यवर्ती कारागृहांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. याशिवाय भायखळा, कल्याण, लातूर आणि अलिबाग जिल्हा कारागृहांमध्येही कारागृह प्रशासनाच्या सहकार्याने कैद्यांच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे.

या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले असून, अनेक बंदीवान नकारात्मक मानसिकतेतून बाहेर पडून समाजात पुन्हा सन्मानाने जगण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. पुनर्वसनाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढविणे, कौशल्य विकास घडवून आणणे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे यावर विशेष भर दिला जात आहे.

राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे कारागृह व्यवस्थेमध्ये सुधारणा होण्यासोबतच समाजात पुन्हा समावेश होणाऱ्या कैद्यांसाठी नवी संधी निर्माण होत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *