मुंबई(mumbai) : मुंबईतील ससून डॉकच्या डिजिटायझेशन आणि आधुनिकीकरणाच्या अनुषंगाने मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी फिनलंडच्या उप-महावाणिज्यदूत इव्हा निल्सन तसेच फिनलंडस्थित सुरक्षा व व्हिडिओ व्यवस्थापन तंत्रज्ञान क्षेत्रातील मिरासिस कंपनीचे प्रतिनिधी अरिंदम सरकार यांच्यासमवेत सविस्तर चर्चा केली.
यावर्षीच्या सुरुवातीला मुंबईतील फिनलंड वाणिज्य दूतावासासोबत ससून डॉक विकासासंदर्भात झालेल्या सामंजस्य कराराचा (एमओयू) आढावा यावेळी घेण्यात आला. ससून डॉकच्या आधुनिकीकरण आणि विकासकामांच्या प्रगतीबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान ससून डॉक परिसरात अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था, स्मार्ट ऑपरेशन्स, पर्यावरणीय व्यवस्थापन, ब्लॉकचेन आधारित दस्तऐवज पडताळणी आणि मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर भर देण्यात आला. तसेच सुमारे १८० पीटीझेड, बुलेट आणि एएनपीआर कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी केंद्रीकृत व्हिडिओ व्यवस्थापन प्रणाली आणि निर्णय सहाय्यक बुद्धिमत्ता प्लॅटफॉर्म उभारण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला.
या उपक्रमामुळे ससून डॉकची कार्यक्षमता, सुरक्षा आणि व्यवस्थापन अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून मत्स्यव्यवसाय क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे.
बैठकीस महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खापले तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
