जेवणाच्या बिलाच्या वादातून सुपरवायझरवर लोखंडी रॉडने हल्ला

पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) : कामगारांच्या जेवणाच्या थकीत बिलाच्या कारणावरून सुपरवायझरवर लोखंडी रॉडने हल्‍ला करण्‍यात आला. ही घटना रविवारी (दि. १२ जुलै) रोजी मावळ तालुक्यातील आंबी येथे रात्री सव्‍वानऊ वाजताच्‍या सुमारास घडली.
राजकुमार ओमदत्‍त कोल (वय २९, रा. आंबी, ता. मावळ) असे जखमी झालेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव आहे. अक्षय शिवदनकर, मारुती नेवरेकर आणि त्‍यांचा एक अल्‍पवयीन साथीदार, अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी शिवदनकर याने फिर्यादी यांना फोन करून हॉटेलवर बोलावून घेतले. त्‍यानंतर लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात मारहाण केली. त्यानंतर मारुती नेवरेकर याने त्याच रॉडने खांद्यावर वार केला, तर एका विधीसंघर्षित बालकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात कोल गंभीर जखमी झाले. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अक्षय शिवदनकर व मारुती नेवरेकर यांना अटक केली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *