*तळेगाव दाभाडे *
तळेगाव दाभाडे शहरात एक संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका १२ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर तिच्याच मित्राने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. नराधमाने एवढ्यावरच न थांबता पीडितेचे आक्षेपार्ह (न्यूड) फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमासह एका कॅफे मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नामांकित कॅफे बनले ‘अंमली व अनैतिक’ कृत्य केंद्र!
पोलीस तपासात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या कॅफेमध्ये हा प्रकार घडला, तिथे असे अनैतिक आणि बेकायदेशीर प्रकार नियमित सुरू असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. शहरातील काही कॅफेच्या आडून अल्पवयीन मुला-मुलींना जाळ्यात ओढले जात असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. या प्रकारामुळे तळेगाव परिसरात पालकांमध्ये तीव्र संताप आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांची कडक कारवाई
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर तळेगाव दाभाडे पोलिसांनी तत्परतेने पावले उचलली. आरोपी मित्र आणि अनैतिक कृत्यांना पाठबळ देणाऱ्या कॅफे मालकाविरुद्ध विविध गंभीर कलमांसह पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जात असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेत आहेत.
”या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. संबंधित कॅफेमध्ये असे गैरप्रकार चालत असल्याचे तपासात समोर आले आहे. यातील आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई केली जात असून, शहरातील इतर कॅफेंचीही तपासणी केली जाईल.”
— कन्हैया थोरात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे
या धक्कादायक घटनेमुळे शहरातील सुरक्षा आणि कॅफे संस्कृतीवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
