​मंडप दरवळला फुलांच्या सुगंधाने; मात्र वाढत्या दरांनी वधूपित्यांना फुटतोय घाम!

​उन्हाच्या झळा, लग्नसराईचा जोर आणि घटलेली आवक; मोगऱ्यापासून गुलाबापर्यंत सर्वच फुले महागली

​पिंपरी-चिंचवड :
मे महिन्यातील लग्नसराई अंतिम टप्प्यात पोहोचली असून पिंपरी-चिंचवड शहरातील फुलबाजार सध्या चांगलाच फुलला आहे. विवाह सोहळे, साखरपुडा, हळद समारंभ आणि स्वागत समारंभांसाठी फुलांना मोठी मागणी वाढली आहे. मात्र, वाढत्या तापमानाचा फटका थेट फुलांच्या बाजाराला बसला आहे. परिणामी फुलांचे दर गगनाला भिडले असून ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.

शहरातील प्रमुख पिंपरी बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच फुलांच्या खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. लग्नमंडप सजावट, गजरे, हार आणि पूजा साहित्याकरिता मोठ्या प्रमाणात फुलांची मागणी होत आहे. मात्र, ग्रामीण भागातून होणारी फुलांची आवक घटली आहे. कडक उन्हामुळे फुलांचे उत्पादन कमी झाले आहे. तसेच वाहतुकीदरम्यान फुले लवकर कोमेजत असल्याने विक्रेत्यांनाही नुकसान सहन करावे लागत आहे.

विशेषतः महिलांच्या आवडीचा मोगरा यंदा सर्वाधिक महागला आहे. गजऱ्यांसाठी मोगऱ्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात मोगऱ्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अनेक ग्राहकांनी कमी प्रमाणात खरेदी करण्यावर भर दिला आहे. लग्न समारंभात फुलांच्या सजावटीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसत आहे.

फुलविक्रेत्यांच्या माहितीनुसार, १५ मेनंतर लग्नाचे मुहूर्त संपणार आहेत. त्यामुळे मागणी कमी होईल. त्यानंतर फुलांचे दर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी बाजारात फुलांचा सुगंध दरवळत असला, तरी वाढलेल्या दरांनी ग्राहकांची चिंता वाढवली आहे.

सध्या बाजारात मोगऱ्याचे दर प्रतिकिलो ८०० ते १००० रुपयांवर पोहोचले आहेत. झेंडूच्या क्रेटसाठी २५० ते ३०० रुपये मोजावे लागत आहेत. निशिगंधाचे दर १८० ते २०० रुपये किलो झाले आहेत. अस्टर फुलांचा भाव १५० ते २०० रुपयांदरम्यान आहे. छोट्या दांडीच्या गुलाब बंडलसाठी ५० ते ६० रुपये लागत आहेत. मोठ्या दांडीच्या गुलाबासाठी ७५ ते ८० रुपये मोजावे लागत आहेत. सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या लिलीच्या बंडलचे दरही वाढले असून ते १० ते २० रुपयांदरम्यान विकले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *