पिंपरी-चिंचवड पोलीस दलात खांदेपालट तीन नव्या उपायुक्तांची एन्ट्री, तर दोन अनुभवी शिलेदारांची बदली

​पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षा यंत्रणेत मोठे प्रशासकीय फेरबदल झाले असून, राज्य शासनाच्या गृह विभागाने पोलीस उपायुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी (दि. १५ मे) जारी केले. या फेरबदलात शहरातून दोन महत्त्वाचे अधिकारी बाहेर पडले असून, त्यांच्या जागी तीन नव्या अधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे. गृह विभागाचे सह सचिव सुग्रिव धपाटे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

शहरातून ‘या’ अधिकाऱ्यांची एक्झिट
​गेल्या काही काळापासून पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यरत असलेल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची अन्यत्र पदस्थापना करण्यात आली आहे:

​विशाल गायकवाड: पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांची पुणे शहर लोहमार्ग येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

शिवाजी पवार: पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त (गुन्हे) शिवाजी पवार यांची आता बृहन्मुंबई येथे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.

​पिंपरी-चिंचवडला मिळाले तीन नवीन शिलेदार
​शहरातील गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी शासनाने तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे:
​रोहिदास ज्ञानेश्वर पवार: छत्रपती संभाजीनगरचे अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार आता पिंपरी-चिंचवडचे नवे पोलीस उपायुक्त असतील.
​संजय सरगौंडा पाटील: महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे कार्यरत असलेले संजय सरगौंडा पाटील यांची वर्णी पिंपरी-चिंचवडच्या उपायुक्त पदी लागली आहे.
​धीरज पाटील: प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, सांगली येथून धीरज पाटील यांची पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रशासनात नव्या समीकरणांची नांदी
​औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये वाढती वाहतूक कोंडी, संघटित गुन्हेगारी आणि सायबर गुन्ह्यांची आव्हाने पेलण्यासाठी या नवनियुक्त अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा शहराला होण्याची शक्यता आहे. एकाच वेळी तीन नवीन अधिकारी शहरात दाखल झाल्यामुळे पोलीस आयुक्तालयातील अंतर्गत कार्यपद्धतीत आणि प्रशासकीय समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे नवीन अधिकारी आता शहराला सुरक्षेचा कोणता नवा पॅटर्न देतात, याकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *