पुणे : अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार पुण्यात व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान गंभीर त्रुटी आढळल्याने प्रसिद्ध ‘मथुरा प्युअर व्हेज’ हे रेस्टॉरंट तातडीने बंद करण्यात आले, तर शहरातील ७ रेस्टॉरंट्सचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
तपासणीदरम्यान स्वच्छतेचा अभाव, कालबाह्य किंवा संशयास्पद अन्नसाहित्याचा वापर, अन्नसुरक्षा मानकांचे उल्लंघन, अन्नसाठवणुकीतील त्रुटी आणि आवश्यक नोंदींचा अभाव अशा अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर संबंधित आस्थापनांविरोधात कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात आली.
एफडीएने स्पष्ट केले आहे की, नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही आस्थापनाला पाठीशी घातले जाणार नाही. अन्नसुरक्षा आणि मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार असून राज्यभर तपासणी मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार आहेत.
या कारवाईनंतर पुण्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनीही स्वच्छता आणि गुणवत्तेबाबत संशयास्पद बाबी आढळल्यास एफडीएकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
