नागपूर : अन्नसुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत प्रतिबंधित खाद्यपदार्थांच्या निर्मिती, वाहतूक आणि विक्रीमध्ये सहभागी असलेल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लागू करण्याबाबत अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी जारी केलेल्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.
बुलढाणा येथील मोहम्मद इक्बाल मोहम्मद शफी यांनी दाखल केलेल्या याचिकेत संबंधित आदेशाला आव्हान देत तो मनमानी, एकतर्फी आणि सामान्य नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा असल्याचा दावा केला आहे.
याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, अन्नसुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत गुन्ह्यांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कायदेशीर तरतुदी अस्तित्वात असताना, अशा प्रकरणांमध्ये थेट मोक्कासारखा कठोर कायदा लागू करण्याचे निर्देश देणे कायद्याच्या चौकटीबाहेरचे असून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने राज्यात भेसळयुक्त आणि प्रतिबंधित खाद्यपदार्थांविरोधात कठोर भूमिका घेतली असून, संघटित पद्धतीने होणाऱ्या अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आवश्यक ते सर्व कायदेशीर पर्याय वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोक्का कायद्याअंतर्गत कारवाईबाबतचे निर्देश जारी करण्यात आले होते.
या आदेशाला न्यायालयात आव्हान दिल्याने आता या प्रकरणाकडे राज्यभरातील दुग्धव्यवसाय, अन्न उद्योग आणि कायदेविषयक तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अशा प्रकारच्या कारवाईचे कायदेशीर स्वरूप आणि भविष्यातील अंमलबजावणीची दिशा स्पष्ट होणार आहे.
