पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण परिसरामध्ये एका मोठ्या तस्करीचा पर्दाफाश करत तब्बल ५७ लाख रुपयांचा गांजासह इतर ऐवज जप्त केला असून दोन तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी (१८ जून) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास चाकण येथील खंडोबामाळ रोडवर करण्यात आली.
या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल विजय दौडकर यांनी गुरुवारी (दि. १८ जून) रोजी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत राजेंद्र बिरंगळे (वय २४, रा. खंडोबामाळ, चाकण) आणि कुशल उद्धव पाठक (वय २४, रा. सुतारदरा, कोथरूड, पुणे) यांना पोलिसांनी अटक केली असून निखिल उर्फ दाद्या कांबळे, सलमान इनामदार, संकेत कौटकर आणि प्रवीण जाधव उर्फ बॉस या चार जणांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विक्रीच्या उद्देशाने एकूण ५७ लाख ७३ हजार ५१० रुपये किमतीचा ८३ किलो ९६० ग्रॅम वजनाचा गांजा, ३ मोबाइल फोन, रोख रक्कम आणि एक चारचाकी गाडी असा मुद्देमाल संगनमत करून जवळ बाळगला होता. आरोपींची चौकशी केली असता त्यांनी हा गांजा फरार आरोपींच्या मदतीने थेट ओडिशा येथून आणल्याची कबुली दिली असून त्यांचा दुसरा गट दुसऱ्या गाडीतून येत असल्याचे सांगितले. उत्तर चाकण पोलीस या आंतरराज्य तस्करीचा तपास करीत आहेत.
चाकण परिसरात ५७ लाखांच्या गांजासह दोघांना अटक; ओडिशातून आणली होती खेप
