pune-पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शिरदे डॅम येथे फिरण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन मित्रमंडळींपैकी दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शिरदे डॅम येथे फिरण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन मित्रमंडळींपैकी दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (17 मे) घडली. करण ज्ञानादेव ढोबरे (वय 20, रा. बालाजीविहार, कोडोली, सातारा) आणि आर्या सुशांत बंडावार (वय 20, रा. गोंदिया) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत सुजल प्रकाश पवार (वय 19, रा. सुसगाव, ता. मावळ ) यांनी कामशेत पोलिसांकडे माहिती दिली. सुजल व त्यांचे मित्र-मैत्रिणी रविवारी सकाळी राजमाची किल्ला परिसरात फिरण्यासाठी गेले होते. मात्र, नंतर त्यांनी शिरदे डॅम परिसरात जाण्याचा निर्णय घेतला. दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास सर्वजण डॅमच्या बॅकवॉटर भागात बसून गप्पा मारत होते.

दरम्यान, आर्या बंडावार आणि ज्योत्सना शेळके पुढे गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने आर्या पाण्यात बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी करण ढोबरे यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, त्यांनाही पोहता येत नसल्याने दोघेही पाण्यात बुडाले. उपस्थित मित्रांनी तसेच पर्यटकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती डायल 100 वर देण्यात आली. पोलिस व स्थानिकांच्या मदतीने दोघांना बाहेर काढून महावीर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार लबडे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *