भांडणात मध्‍यस्थी करणा-या मामाकडून भाचीच्‍या पतीचा खून

पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – भाची आणि तिच्‍या पतीच्‍या भांडणात मध्‍यस्‍थी करण्‍यासाठी गेलेल्‍या मामाने भाचीच्‍या पतीला मारहाण केली. यामध्‍ये त्‍याचा मृत्‍यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी रात्री १० वाजताच्‍या सुमारास मावळ तालुक्यातील परंदवडी येथे घडली.
लक्ष्मण उर्फ दगडु मुकणे असे खून झालेल्‍या मजुराचे नाव आहे. संतोष रघु वाघमारे (वय ४०, रा. मनोहर आनाजी भोते यांची विटभट्टी, परंदवडी, ता. मावळ, जि. पुणे) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत सुनिता लक्ष्मण उर्फ दगडु मुकणे (वय २७, रा. परंदवडी, ता. मावळ, जि. पुणे) यांनी शुक्रवारी (दि. २४ एप्रिल) रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री दहा वाजताच्‍या सुमारास परंदवडी येथे फिर्यादी सुनिता आणि त्यांचे पती लक्ष्मण उर्फ दगडु मुकणे यांच्यात घरगुती कारणावरून भांडण सुरू होते. हे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीचा मामा आरोपी संतोष तिथे आला. मात्र, मयत लक्ष्मण कोणाचेही ऐकत नसल्याच्या रागातून आरोपीने त्यांच्या डाव्या कानावर लाकडी दांडक्याने जोरात प्रहार केला. या गंभीर दुखापतीमुळे तो बेशुद्ध पडला. त्‍यास रुग्‍णालयात दाखल कले असता डॉक्‍टरांनी त्‍यास मयत घोषित केले. आरोपी संतोष वाघमारे याला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. तळेगाव दाभाडे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *