एका हॉटेलच्या गाळ्यामध्ये बेकायदेशीरपणे आणि विनापरवाना देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या दोन नोकरांना पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवार (५ जून) रात्री ९ वाजता साईप्रसाद हॉटेल, गणेशनगर, तळवडे रोड येथे करण्यात आली. सुदीपकुमार पालनकुमार (२०) आणि दिलीप मुंशीलाल गौतम (१९, दोघे रा. साईप्रसाद हॉटेल, तळवडे रोड) यांच्यासह हॉटेल मालक सचिन कुमार नाईक आणि जागा मालक पानसरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विनोद व्होनमाने यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मालकाच्या सांगण्यावरून आरोपी नोकरांनी गाळ्यामध्ये विनापरवाना ११ हजार ५४५ रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, दारू साठवण्यासाठी वापरलेला फ्रीज, ४० हजार रुपयांच्या बिअरचा साठा आणि ४ हजार ५८० रुपये रोख रक्कम असा एकूण ६६ हजार १२५ रुपयांचा माल विक्रीसाठी बाळगला होता. तसेच जागा मालकाने गाळ्यात बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याचे माहीत असूनही गाळा भाड्याने दिला असल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.
