मान्सूनपूर्व काळात वाढला विजांचा धोका; पिंपरी-चिंचवडकरांना प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन
पिंपरी-चिंचवड :
मान्सूनपूर्व वातावरणातील बदल, ढगांचा वाढता गडगडाट आणि वादळी पावसाच्या घटनांमुळे पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात विविध ठिकाणी विजा कोसळण्याचा धोका वाढला आहे. दरवर्षी पावसाळ्यात वीज पडून जीवित आणि वित्तहानीच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे आणि भारत सरकारच्या ‘दामिनी लाइटनिंग अलर्ट’ या मोबाईल ॲपचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, याच धोक्याची प्रचिती शहराला यंदाच्या मे महिन्यात आली होती. भोसरी परिसरात अवकाळी पावसादरम्यान दोन ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे विजांच्या धोक्याबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
१५ मिनिटे आधी मिळणार धोक्याचा संदेश
‘दामिनी’ ॲप हे जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित आहे. परिसरात वीज पडण्याची शक्यता निर्माण होताच हे ॲप सुमारे १५ मिनिटे आधी सूचना देते. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
प्रशासनाची जनजागृती मोहीम
आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबत जनजागृती सुरू केली आहे. शासकीय कर्मचारी, ग्रामसेवक, आपत्ती मित्र, आशा सेविका आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना माहिती दिली जात आहे.
वीज कडाडत असताना घ्या ही खबरदारी
झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात उभे राहू नका.
लोखंडी वस्तूंपासून दूर राहा.
मोबाईल चार्जिंगला लावून वापरणे टाळा.
सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या.
पावसात दुचाकी किंवा सायकलवर उघड्या जागेत थांबू नका.
मोबाईलमध्ये ‘दामिनी’ ॲप कसे डाउनलोड कराल?
गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरमध्ये जाऊन Damini Lightning Alert शोधा. ॲप डाउनलोड करून लोकेशन आणि नोटिफिकेशन सुविधा सुरू ठेवा.
हवामानातील अनिश्चितता वाढत असताना तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षा करणे ही काळाची गरज बनली आहे. पिंपरी-चिंचवडकरांनी सतर्कता बाळगल्यास अनेक संभाव्य दुर्घटना टाळणे शक्य होणार आहे.
