पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – ‘तू माझ्या बहिणीशी का बोलतो?’ असा जाब विचारत एका तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गाडीत घालून पळवून नेले. ही घटना उर्से टोलनाका येथे शनिवारी (दि. १८ एप्रिल) रोजी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली आहे.
कृष्णा चंद्रभान चव्हाण (वय २१), आदेश रोहीदास कारके (वय २२), साहील मधुकर गायकवाड (वय २३), मेघराज शंकर राऊत (वय २६) आणि कृष्णा वासुदेव साधू (वय २०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एका महिलेने शनिवारी (दि. १८ एप्रिल) रोजी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ लतिकेश दांगट हा शनिवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास उर्से टोलनाका येथे बॅनर लावण्यासाठी गेला होता. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी कृष्णा चव्हाण याने ‘तू माझ्या बहिणीसोबत का बोलतोस?’ असे म्हणत लतिकेशला लाकडी दांडक्याने मारहाण केली. इतर आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून बळजबरीने गाडीत घालून नेले. या प्रकरणाचा पुढील तपास शिरगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक पारखे करत आहेत.
बहिणीशी का बोलतो? विचारत तरुणाचे अपहरण करून मारहाण; पाच जण अटकेत
