पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – माशांना पाणी मारत असताना ते टपरीचे काम करणा-यांच्या अंगावर उडाले. या किरकोळ वादातून एका मासे विक्रेत्या महिलेला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथील दवाबाजार परिसरात घडली.
संदीप चाफळकर (वय ४५), लकी ऊर्फ सोन्या चाफळकर (वय १९) आणि एका महिला (सर्व रा. जाधववाडी, मोशी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत एका महिला फिर्यादीने मंगळवारी (दि. ५ मे) रोजी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला फुटपाथवर मासे विकत असताना शेजारच्या टपरीचे काम करणाऱ्या लोकांच्या अंगावर चुकून पाणी उडाले. याचा जाब विचारत आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. आरोपी संदीपने फिर्यादीला धक्का देऊन खाली पाडले, तर त्याच्या मुलाने लकी ऊर्फ सोन्या याने लोखंडी रॉडने महिलेच्या हातावर आणि डोक्यात मारून तिला जखमी केले. पोलीस हवालदार बाचनकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मासे विक्रेत्या महिलेला लोखंडी रॉडने मारहाण
