रायगड(raigad) : रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला असून पुढील काही दिवस उष्ण व दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील दुपारच्या सत्रातील शाळा आता सकाळच्या सत्रात घेण्यात येणार आहेत. उष्णतेपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने हा बदल तातडीने लागू करण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार तापमानात अजून वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, तसेच उन्हात बाहेर पडताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
