Mumbai-आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लोकभवनात योगसत्र; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा सहभाग

मुंबई(mumbai) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महाराष्ट्र लोकभवन येथे भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकारी व जवानांसह योगसत्रात सहभाग घेतला. यंदाचा योग दिन महाराष्ट्र लोकभवन आणि भारतीय तटरक्षक दल यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसेच लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, आज योगाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून, पूर्वी योगाचा अभ्यास प्रामुख्याने घरे, आश्रम आणि योग संस्थांपुरताच मर्यादित होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाकडे २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्याचे आवाहन केल्यानंतर जगातील १५० हून अधिक देशांमध्ये हा दिवस साजरा केला जात आहे, ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे.

राज्यपालांनी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांना योगाचा अधिक व्यापक प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन केले. तसेच जगासाठी दर्जेदार योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडविण्याची जबाबदारी विद्यापीठांनी स्वीकारावी, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांनी भारतीय तटरक्षक दलाच्या कार्याचे विशेष कौतुक केले. सन १९७७ मध्ये स्थापन झालेले भारतीय तटरक्षक दल यंदा आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असून, राष्ट्रसेवेत त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. कठीण परिस्थितीतही तटरक्षक दलाचे अधिकारी आणि जवान अथक परिश्रम करून भारताचे सागरी क्षेत्र सुरक्षित, संरक्षित आणि समृद्ध ठेवत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या योगसत्रातून योगाचे महत्त्व आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत योगाभ्यास केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *