बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून ५ लाख १० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १५ मे ते २० मे दरम्यान जनता सहकारी बँक, चिंचवड स्टेशन समोर घडली.
या प्रकरणी सुजितकुमार काकासाहेब भोसले (४०, आंबेगाव पठार, पुणे; मूळ- खरसुंडी, सांगली) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रशांत मोहन गायकवाड (३५, खेड राजगुरूनगर, पुणे) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना त्यांचे बँकेत गहाण असलेले ६० ग्रॅम सोने सोडवण्यासाठी ५ लाख १० हजार रुपये घेऊन येण्यास सांगितले. या व्यवहाराचा लेखी करार करून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीला ही रक्कम स्वतःच्या बँक खात्यात भरण्यास भाग पाडले. मात्र, गहाण ठेवलेले सोने न सोडवता आरोपी बँकेतून परस्पर निघून गेला आणि फिर्यादीची फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
