सांगवीत सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला पुलाच्‍या कामातील भष्‍ट्राचाराच्‍या आरोपांनंतर हल्‍ला

पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – सांगवी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप तनपुरे यांच्यावर शुक्रवारी (दि. १७) रात्री पाच जणांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तनपुरे जखमी झाले असून त्यांच्यावर थेरगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
अभिषेक नारायण शेगडे (वय २०) आणि अंकित कुमार उर्फ कल्लू राजेश मोरया (वय १९) अशी अटक केलेल्‍या आरोपींची नावे आहेत. सांगवी पोलीस ठाण्‍याचे वरिष्‍ठ निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी तनपुरे हे आपल्‍या दुचाकीवरून चालले होते. ते माकन हॉस्‍पिटलजवळ आले असता दुचाकीवरून आलेल्‍या तीन जणांनी त्‍यांना शिवीगाळ करीत लाथा-बुक्‍क्‍यांनी आणि कमरेच्‍या पट्‌ट्याने मारहाण केली. त्‍यानंतर दुचाकीवरून आलेल्‍या आणखी दोघांनी मारहाण केली. या हल्‍ल्‍यात तनपुरे हे जखमी झाले असून त्‍यांना पाच ते सात टाके पडले आहेत.
काही दिवसांपूवी दिलीप तनपुरे यांनी सांगवी बोपोडी पुलाच्‍या कामात झालेल्‍या भष्‍ट्राचारावरून सत्‍ताधारी पक्षावर गंभीर आरोप केले होते. त्‍यातूनच हा हल्‍ला झाल्‍याचा आरोप तनपुरे यांनी केला आहे. या हल्‍ल्‍यामागे सत्‍ताधारी पक्षाचे काही लोकप्रतिनिधी असल्‍याचा दावा तनपुरे यांनी केला आहे.
हल्ल्यापूर्वी तनपुरे यांना व्हॉट्सअ‍ॅपवर धमकीचा संदेश आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर काही तासांतच त्यांच्यावर हल्ला झाल्याने हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या आरोपामुळे प्रकरणाला राजकीय रंग मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन संशयितालाही ताब्यात घेतले आहे.
घटनेनंतर सांगवी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीसांनी सुरक्षा वाढवली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *