पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – तळेगाव दाभाडे बसस्थानक परिसरात एका २२ वर्षीय विद्यार्थ्याला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत १४ हजार रुपये लुटले. ही घटना शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली.
करण आनंद घाडगे (वय १९ वर्षे, रा. गोसावी वस्ती, तळेगाव दाभाडे) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच त्याचे तीन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. सत्यम लक्ष्मीकांत मोरे (वय २० वर्ष, रा. वराळे, ता. मावळ, जि. पुणे मूळ रा. लातूर) यांनी शनिवारी (दि. १८ एप्रिल) रोजी यासंदर्भात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सत्यम आणि त्यांचा मित्र शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास गाडीत पेट्रोल भरून रूमवर परतत असताना पाठीमागून एका तपकिरी रंगाच्या ॲक्सेस दुचाकीवरून दोन मुले आली. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांना लोकमान्य शाळेच्या मागे नेले. तिथे आरोपींनी आपल्या इतर साथीदारांना बोलावून घेतले आणि फिर्यादींना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर गळ्यावर कोयता ठेवून ६,००० रुपये रोख लुटले आणि तळेगाव-चाकण रोडवरील बँक ऑफ बडोदाच्या एटीएममधून जबरदस्तीने ८,००० रुपये काढायला लावले. एकूण १४,००० रुपये घेऊन आरोपी पसार झाले होते. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोहारे करत आहेत.
तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले
