पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला एक गुंड आदेशाचा भंग करून बेकायदेशीररीत्या शहरात आला. तसेच त्याने बंदी आदेश असतानाही कोयता जवळ बाळगला. याप्रकरणी पोलिसांनी त्याला खेड तालुक्यातील कडाचवाडी परिसरातून शनिवारी सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास अटक केली.
मिथून मच्छिंद्र माने (वय ३६ वर्षे, रा. मेदनकरवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई रेवन्नाथ बाबासाहेब खेडकर यांनी शनिवारी (दि. १८ एप्रिल) रोजी याप्रकरणी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मिथून याला पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ यांनी १८ नोव्हेंबर २०२४ रोजी दोन वर्षांसाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. असे असतानाही तो कोणतीही परवानगी न घेता हद्दीत आला होता. कडाचीवाडी येथील पी. के. कॉलेजच्या मागे मोकळ्या जागेत तो ५०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता बाळगून फिरत असताना पोलिसांनी त्याला पकडले. या प्रकरणाचा पुढील तपास दक्षिण चाकण पोलीस ठाण्याचे महिला पोलीस हवालदार देशमुख करत आहेत.
तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
