गर्दीचा फायदा घेऊन महिलेची सोन्याची पोत चोरी; आरोपींना अटक

पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – बापुजीबुवा मंदिर परिसरात यात्रेनिमित्‍त झालेल्‍या गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या पर्समध्‍ये ठेवलेले गळ्यातील सोन्याची पोत पर्स कापून चोरून नेली. ही घटना शनिवार (दि. १८ एप्रिल) रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास थेरगाव येथे घडली. पोत चोरीची घटना लक्षात येताच महिलेने आणि तिच्‍या नातेवाईकांनी आरोपींना पकडून पोलिसांच्‍या ताब्‍यात दिले.
याप्रकरणी नागिनी सिद्धेश्वर तांभाळे (वय ४०, रा. दगडूपाटील नगर, थेरगाव) यांनी रविवारी (दि. १९ एप्रिल) रोजी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुरज सुरेश खाडे (वय २७, रा. मुंजेवाडी, अहमदनगर) आणि रावसाहेब साहेबराव जाधव (वय ५०, रा. गणेगाव, धाराशिव) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला थेरगाव येथील बापुजीबुवा मंदिर परिसरात यात्रेनिमित्‍त गेली असताना आरोपींनी संगनमत करून गर्दीमध्ये त्यांच्या पर्स कापली. पर्समधील २५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची काळया मण्यांची पोत त्यांनी चोरून नेली. ही बाब लक्षात येताच महिलेने आपल्‍या नातेवाईकांच्‍या मदतीने चोरट्यांना पकडून पोलिसांच्‍या ताब्‍यात दिले. काळेवाडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *