पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार असतानाही शहरात विनापरवाना वावरणाऱ्या आणि जवळ शस्त्र बाळगणाऱ्या एका तडीपार गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. १९ एप्रिल) रोजी रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास कासारवाडी येथे करण्यात आली.
अथर्व उर्फ सोन्या दीपक परदेशी (वय २३, रा. कासारवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई नितीन सुरेश संकुनहट्टे (वय २७) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अथर्व याला परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्तांनी एका वर्षासाठी पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले होते. तरीही तो कोणतीही परवानगी न घेता कासारवाडीतील सिंतागण गार्डन परिसरात वावरत होता. त्याच्याकडे एक लोखंडी कोयता देखील आढळून आला आहे. त्याने तडीपारीच्या आदेशाचे तसेच शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने दापोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक भोसले याबाबत अधिक तपास करीत आहेत.
तडीपार गुंडाला कासारवाडीत कोयत्यासह अटक
