पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – अंमली पदार्थ विरोधी पथकाने हिंजवडी परिसरात छापा टाकून गांजाची विक्री करणाऱ्या एका परप्रांतीय तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून गांजा आणि मोबाइल असा एकूण २७ हजार ४०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
बिपिन कुमार पृथ्वीपाल प्रजापती (वय २०, रा. माण गाव, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार मितेश मोहन यादव यांनी सोमवारी (दि. २० एप्रिल) रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथील माण गाव रोडवर आरोपी गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे ३४८ ग्रॅम गांजा सापडला. चौकशीत त्याने हा माल पिंपरीतील भाटनगर येथील गायवाली गीताबाई हिच्याकडून आणल्याचे कबूल केले. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हिंजवडीत गांजा विक्री करणाऱ्या तस्करास अटक; ३४८ ग्रॅम मुद्देमाल जप्त
