पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) – आळंदी येथील एका मंगल कार्यालयात लग्नानंतर नवरदेवाचा फेटा काढल्याच्या कारणावरून संतापलेल्या एका व्यक्तीने ब्राह्मणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या हाताचे मनगट फॅक्चर झाले आहे. ही घटना मंगळवारी (दि. 21 एप्रिल) रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.
गणेश लक्ष्मण दाभेकर (रा. नगाजीमहाराज धर्मशाळा, आळंदी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुकर लक्ष्मण पांडे (वय 60, रा. केळगाव रोड, आळंदी) यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता कुलवधू मंगल कार्यालय येथे आरोपीने फिर्यादीला विचारले की, तुम्ही नवरदेवाचा फेटा लगेच का काढला? त्यामुळे मला नवरदेवाकडील लोकांनी कमी पैसे दिले. याच रागातून आरोपीने फिर्यादीला भरचौकात अश्लील शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. यात फिर्यादीच्या उजव्या डोळ्याला इजा झाली असून हात फॅक्चर झाला आहे. या प्रकरणाचा तपास आळंदी पोलीस करत आहेत.
लग्नात नवरदेवाचा फेटा काढल्याच्या कारणावरून ब्राह्मणाला मारहाण
