३० एप्रिलपासून होणार शिबिरांसाठी ऑनलाइन स्लॉट बुकिंग
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – पक्क्या वाहन परवान्यासाठी (लायसन्स) आरटीओचा मे महिन्यातील विशेष दौरा जाहीर करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे खेड, मंचर, जुन्नर, मावळ आणि लोणावळा परिसरातील नागरिकांना पिंपरीपर्यंत येण्याची गरज उरणार नाही.
आरटीओ पिंपरी-चिंचवड कार्यालयाने ग्रामीण भागातील नागरिकांची सोय लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. मे महिन्यात विविध तालुक्यांमध्ये नियोजित तारखांना शिबिरे भरवली जाणार आहेत. खेड येथे ४ ते ६ मे, मंचर येथे ११ ते १३ मे, जुन्नर येथे १८ ते २० मे, वडगाव मावळ येथे २२, २५ आणि २६ मे तर लोणावळा येथे २८ आणि २९ मे रोजी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
या शिबिरांसाठी ऑनलाइन स्लॉट बुकिंग ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरू होणार आहे. इच्छुकांनी वेळेत नोंदणी करणे आवश्यक आहे. या शिबिरांमध्ये पक्क्या लायसन्ससाठी आवश्यक चाचण्या घेतल्या जाणार आहेत.
या निर्णयामुळे नागरिकांचा वेळ आणि प्रवास खर्च वाचणार आहे. स्थानिक पातळीवरच आरटीओ सेवा उपलब्ध होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पक्क्या लायसन्ससाठी आरटीओचा मे महिन्यातील दौरा जाहीर
