घरगुती मसाला बनवणे झाले कठीण
उन्हाळा आला की मसाला करण्याची लगबग सुरू होते. पण यंदा मसाल्यांच्या बाजारात महागाईचा तडाखा बसला आहे. साहित्याचे दर वाढल्याने गृहिणींचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे.
वाढत्या दरांचा फटका:
यंदा मसाल्यांच्या साहित्यात मोठी दरवाढ झाली आहे. मिरची, धने आणि जिरे यांच्या किमतीत १५ ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हवामानातील बदलामुळे उत्पादनावर परिणाम झाला. पिकांचे नुकसान झाल्याने बाजारात पुरवठा कमी झाला आहे. परिणामी, दर गगनाला भिडले आहेत.
मसाला बनवणे आता महागडे:
पूर्वी घराघरात मसाला तयार करण्याची परंपरा होती. मात्र आता साहित्य खरेदी करणे परवडेनासे झाले आहे. साहित्य निवडणे आणि वाळवणे ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यातच मसाला कुटण्याचा (कांडप) खर्च वाढला आहे. सध्या शहरात कांडपाचे दर ५० रुपये प्रति किलो झाले आहेत. गॅस महागल्याने साहित्य भाजण्याचा खर्चही खिशाला कात्री लावणारा ठरत आहे.
वाढत्या महागाईचे वास्तव:
– गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरेदीची ताकद कमी झाली आहे.
- ५ किलो तिखट होणाऱ्या पैशात यंदा ३ किलोही तिखट होत नाही.
- अनेक कुटुंबांनी मसाल्याचे प्रमाण कमी केले आहे.
- स्वयंपाकघरातील चवीपेक्षा बजेट जपण्याकडे कल वाढला आहे.
तयार मसाल्यांना मिळतोय प्रतिसाद:
कष्ट आणि वेळ वाचवण्यासाठी नागरिक आता ‘रेडीमेड’ मसाल्यांकडे वळत आहेत. बाजारात दर्जेदार तयार तिखट ४०० रुपयांपासून उपलब्ध आहे. घरगुती चव हवी असली तरी, महागाईमुळे नागरिकांना तयार पाकिटांचा आधार घ्यावा लागत आहे.
गृहिणींची प्रतिक्रिया:
“घरगुती मसाल्याची चव आणि दर्जा वेगळा असतो. पण सध्या साहित्य खूप महाग झाले आहे. खर्च आणि मेहनत पाहता आता तयार मसाला वापरण्याशिवाय पर्याय उरला नाही,” अशी प्रतिक्रिया शहरातील गृहिणींनी दिली आहे.
