थ्री इडीयट्स’मधील ग्राहकाला बेदम मारहाण

हॉटेलमध्ये बिल देण्याच्या कारणावरून पार्किंगमध्‍ये झाली बाचाबाची
​पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – पिंपळे गुरव येथील ‘हॉटेल थ्री इडीयट्स’च्या पार्किंगमध्ये बिल देण्याच्या वादातून एका ग्राहकाला आणि त्याच्या मित्रांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. २६ एप्रिल) रोजी मध्‍यरात्री दीड वाजताच्‍या सुमारास घडली.
विकास अनिलकुमार सेवाणी (वय २५, रा. पीडब्लुडी बिल्डिंग, पिंपरी), अशिष सुनील भेगडे (वय २९, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे), प्रेम दिलबहादूर थापा (वय २१, रा. पिंपळे गुरव) आणि अनिलकुमार अर्जनदास मेवाणी (वय ५२, रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल करण्‍यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत. सुरज शंकर झांजुर्णे (वय ३२, रा. इंद्रायणी नगर, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्‍यांनी रविवारी (दि. २६ एप्रिल) रोजी यासंदर्भात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ एप्रिल रोजी पहाटे १:३० च्या सुमारास हॉटेलचे मालक आणि कर्मचारी एका ग्राहकासोबत बिलाच्या कारणावरून वाद घालत होते. फिर्यादी सुरज आणि त्यांचे मित्र हा वाद सोडवण्यासाठी गेले असता, “तुम्ही आमच्या मध्ये का येता?” असे म्हणून आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी विकास सेवाणी याने हातातील कड्याने सुरज यांच्या तोंडावर, ओठावर आणि नाकावर मारून त्यांना गंभीर जखमी केले व जिवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *