पिंपरी: प्रार्थनेद्वारे असाध्य आजार बरे करण्याचा
दावा करत अंधश्रद्धा पसरवणार्या भोंदू ख्रिश्चन धर्मगुरूचे मोबाईलमध्ये
चित्रीकरण करणार्या तरूणासह तिघांना चर्चमधील सात ते आठ जणांनी
लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना काळेवाडीतील ‘जीजस इस लॉर्ड
चर्च’मध्ये रविवारी (दि. २६) सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीचच्या दरम्यान
घडली. काळेवाडी पोलिसांनी धर्मगुरू तसेच, त्यांच्या आठ सहकार्यांवर
गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले
आहेत.
केनेथ सिल्वे असे गुन्हा दाखल केलेल्या ख्रिश्चन धर्मगुरूचे नाव आहे.
त्यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व
जादुटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर,
त्यांच्या आठ सहकार्यांवर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सिद्धांत शाहूराज चव्हाण (वय ३५, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी
काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चव्हाण हे सामाजिक कार्यकर्ते
आहेत. काळेवाडी येथे ‘जीजस इस लॉर्ड चर्च’ आहे. या चर्चमध्ये पास्टर
केनेथ हा बेकायदेशीररित्या लोकांना जमा करून त्यांची प्रार्थना घेतो.
प्रार्थनेद्वारे लोकांचे गंभीर आजार बरे करतो, असा दावा करून समाजात
अंधश्रद्धा पसरवत असल्याचे समोर आले.
रविवारी फिर्यादी चव्हाण हे धर्मगुरूचे मोबाईलमध्ये याप्रकरणाचे
चित्रीकरण करीत होते. ते पाहून चिडलेल्या केनेथ याने प्रार्थनेसाठी
उपस्थित असलेल्या ७ ते ८ जणांना फिर्यादीला मारहाण करण्यासाठी चिथावणी
दिली. आरोपींनी चव्हाण यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली.
तसेच, त्यांना वाचवण्यासाठी आलेले प्रतीक विलास खराडे आणि वैभव संतोष
सावंत यांनाही आरोपींनी मारहाण केली.
दरम्यान, याप्रकरणी निकसन जोसेफ थॉमस (वय ५४, रा. अजमेरा, पिंपरी) यांनी
परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सिद्धांत चव्हाण याच्यासह चार
जणांवर गुन्हा दाखल केला आहे. धार्मिक प्रार्थना सुरू असताना आरोपी
सिद्धांत चव्हाण याच्यासह चार जणांनी चर्चमध्ये येऊन फिर्यादी यांच्यासह
दहा जणांना आरडाओरडा करीत जीवे मारण्याची धमकी दिली आणि मारहाण करीत
प्रार्थनेत व्यत्यय आणला. त्यांच्याविरोधात काळेवाडी पोलिस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रार्थनेद्वारे असाध्य आजार बरे करण्याचा दावा करणार्या भोंदू ख्रिश्चन धर्मगुरूवर गुन्हा
