पिंपरी चिंचवड शहरातील डुडुळगाव ठरले पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ‘हॉट’!

पिंपरी-चिंचवडमध्ये ३९.९°C तापमानाची नोंद: पुणे जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट; शहरात दुपारी रस्ते ओस, नागरिक त्रस्त

पिंपरी-चिंचवड – पुणे जिल्ह्यात उन्हाचा पारा झपाट्याने वाढत असून आज पिंपरी-चिंचवडमधील डुडुळगाव येथे सर्वाधिक ३९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यातील इतर भागांनाही उष्णतेचा जोरदार तडाखा बसत आहे.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातही उकाडा असह्य झाला आहे. कोरेगाव पार्क आणि शिवाजीनगर येथे तापमान ३९.८ अंशांपर्यंत पोहोचले. मगरपट्टा परिसरात ३९.७ अंश तापमानाची नोंद झाली. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.

पिंपरी-चिंचवडमध्येही उष्णतेची तीव्रता वाढली आहे. चिंचवड आणि पाषाण येथे ३८.५ अंश तापमान नोंदले गेले. हडपसर आणि तळेगाव भागातही पारा ३८ अंशांच्या पुढे गेला आहे.
ग्रामीण भागात बारामती आणि हवेली येथे ३९.३ अंश तापमान नोंदले गेले. राजगुरुनगर आणि नारायणगाव येथे काहीसा दिलासा मिळाला.

शिरूरमध्ये तापमान ३६.६ अंशांवर स्थिरावले.
दरम्यान, निमगिरी आणि माळीण या डोंगराळ भागात तुलनेने कमी तापमान नोंदले गेले. येथे पारा ३५ अंशांच्या आसपास राहिला.

उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुपारी १२ ते ४ दरम्यान बाहेर पडणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे. सुती कपड्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *