पिंपरी-चिंचवड :
पिंपरी कॅम्पमधील रिव्हर रोड परिसर आणि बाजारपेठेत सध्या वीजचोरीचा उघड नंगानाच सुरू आहे. महावितरणच्या डी. पी. बॉक्समधून खुशाल वीज चोरली जात असून, त्यावर काही बडे शोरूम्स चक्क एअर कंडिशनर्स (AC) चालवत आहेत. विशेष म्हणजे, या सर्व प्रकाराची कल्पना स्थानिक अधिकाऱ्यांना असूनही ते डोळे झाकून बसले आहेत. “सामान्यांसाठी एक न्याय आणि बड्या धेंडांसाठी दुसरा?” असा संतप्त सवाल आता शहरातील प्रामाणिक वीज ग्राहक विचारत आहेत.
बड्या व्यापाऱ्यांचे ‘एसी’ चोरीच्या विजेवर!
पिंपरी बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या काही शोरूम्समध्ये चोरीच्या विजेचा वापर करून थाटात एसी चालवले जात आहेत. यामुळे महावितरणचे दरमहा लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. जेव्हा एखादा प्रामाणिक अधिकारी कारवाईसाठी पुढे येतो, तेव्हा हे व्यापारी संघटित होऊन गोंधळ घालतात आणि अधिकाऱ्यांवरच दबाव टाकतात. या दबावापोटी महावितरणचे प्रशासन आता गुंडांसमोर नतमस्तक झाले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
झोपडपट्टीत ‘वीज माफियांची’ समांतर सत्ता
केवळ बाजारपेठच नव्हे, तर शहरातील झोपडपट्टी भागातही ‘वीज माफिया’ सक्रिय आहेत. दरमहा २०० ते ३०० रुपये घेऊन हे ‘दादा’ अनधिकृत कनेक्शन वाटत आहेत. महावितरणने यापूर्वी काही मोहिमा राबवल्या, पण त्या केवळ ‘नावालाच’ ठरल्या. आज कारवाई झाली की दुसऱ्याच दिवशी पुन्हा तारा टाकून वीज चोरी सुरू होते. महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय ही समांतर व्यवस्था चालणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे.
प्रामाणिक ग्राहकांचा छळ; वसुलीचा मात्र कडाका!
एकीकडे लाखो रुपयांची वीज चोरी होत असताना, महावितरण आपला तोटा भरून काढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना लक्ष करत आहे. एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबाने चुकून एक महिना वीज बिल भरले नाही, तर कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचे कनेक्शन कापले जाते. पुन्हा वीज जोडणीसाठी अडीचशे रुपयांपेक्षा जास्त दंड उकळला जातो.
”ज्यांच्याकडे चोरी पकडण्याची हिंमत नाही, ते गरीब ग्राहकांच्या दारात जाऊन दादागिरी करतात,” अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
नक्की पाणी मुरतंय कुठे?
रिव्हर रोडवरील डी. पी. बॉक्स उघड्यावर असून तिथून सर्रास वायर टाकून वीज चोरली जातेय. हे महावितरणच्या गस्ती पथकाला दिसत नाही का? की ‘हप्तेखोरी’ मुळे या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे? अधिकाऱ्यांचे हे मौन नक्कीच संशयास्पद असून यात नक्कीच काहीतरी ‘पाणी मुरत’ असल्याचे स्पष्ट होत आहे.
नागरिकांचा इशारा:
आता तरी कारवाई होणार का?
महावितरणने जर ही वीज चोरी तत्काळ थांबवली नाही आणि संबंधित दोषींवर गुन्हे दाखल केले नाहीत, तर सामान्य नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या या माफियांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी जोर धरत आहे.
आता चेंडू महावितरणच्या कोर्टात आहे – ते केवळ गरिबांची वीज कापण्यात धन्यता मानणार की बड्या चोरांच्या मुसक्या आवळणार?
